निळं गुलाब !!!

निळं गुलाब !!!

Wednesday, 4 January 2012

कोकणची माणसं साधी भोळी .... काळजात त्यांच्या भरली शहाळी.....!!


मी स्वतः कोकणातली.... सिंधुदुर्ग जिल्ह्यातली .... कोकणातला निसर्ग, समुद्र, पायवाटा, मालवणी जेवण, ती भाषा ...आहा हा ... काय काय सांगायचं ? ... सगऴं सगऴं अगदी भारावून टाकणारे आहे... "येवा कोकण आपलोच आसा " असे म्हणत स्वागत करणारी कोकणी माणसं! त्यामुळे अर्थातच मला कोकणात जन्मल्याचा अभिमान आहे. मुंबईत स्थायिक असल्यामुळे गावी जायचा योग तसा कधीतरीच .... पण मुंबईत सुद्धा आजूबाजूला इतके कोकणी शेजारी आहेत कि कोकणातली कमतरता मला तरी मुंबईत भासली नाही ..आता निसर्ग नाहीये तसा पण माणस अगदी कोकणातली !!!

कोकणची माणसं साधी भोळी .... काळजात त्यांच्या भरली शहाळी.... हे गाणं मी लहानपणा पासून ऐकतेय तेव्हा मला आपल्या माणसांबद्दल एवढे छान छान गाणं केलय म्हणून आनंद व्ह्यायचा तरीही .....याचा अर्थ मला अजून उलगलेला नाहीये .... ते म्हणजे कोकणची माणसं तीहि साधी भोळी ??? ये बात कुछ हजम नाही हुई .. तसं साधी माणसं सगळीकडेच असतात पण काळजात त्यांच्या भरली शहाळी....हे जरा अति होतंय आता .. मी जेवढ्या कोकणी माणसाना भेटलेय त्यावरून तरी कोकणी लोक हे अतिशय चलाख आणि चतुर असतात ... म्हणजे कुणाची बिशाद असेल जर का एखाद्या कोकणी माणसाला टोपी लावाल ? भांडण्यात १ नंबर अट्टल ... कोकणी शिव्या ऐकलात का कधी ? आता ते "आवाशीचो घो ..... " वैगरे सोडून अशा काही शिव्या हासडतील ..?? जर का ऐकाल तर मला असे वाटते कि सगळ्यात जास्त शिव्यांचा भांडार जर का कुणाकडे असेल तर आमच्या कोकणी माणसाकडे ....बोलायला तर अजिबात ऐकणार नाहीत ... जस काय सगळ्या जगाचं शहाणपण यांच्यातच भरलय ...भाषाच इतकी तगडी आहे कि समोरचा माणूस ऐकतानाच गार होऊन जाईल.!
शाळेत असताना गावातले काका, आज्जी, मावश्या अशी गोतावळ वरचेवर आमचा कडे असायची.... त्यांची ती उच्च स्वराची एकेरी भाषा ऐकताना वाटायचं कि हे लोक बोलताहेत कि भांडताहेत .... ? मानापमान ठासून भरलेली ..... लग्नात, सुतकात यांना कळवले नाही तर तुमची काही खैर नाही. १०० वर्षा पूर्वीच्या गोष्टी सुद्धा अगदी अगदी लक्षात ठेवतील आणि उकरून काढतील... कधी ? त्याचा काही नेम नाही ........यांनी बोललेली गोष्ट म्हणजे काळ्या दगडावरची रेख ..सगळ्यात अवघड गोष्ट असते यांचा साठी ती म्हणजे माफी मागणे .... स्वतःची कितीही चूक असली तरी ... मोडेन पण वाकणार नाही असा पावित्रा असलेली लोक म्हणजे कोकणी माणसं!

फार झालं हा ? एवढी पण काही वाईट नाहीयेत हा आमची कोकणी माणसं... शेवटी चांगली वाईट लोक प्रत्येक भागात असतात नाही का ? ....मी कोकणी माणसाना जेवढ जवळून पाहिलंय त्यावरून तरी मला या लोकांचा अभिमान आहे..... "अतिथी देवो भव:" म्हणजे काय ?? ते या लोकांकडून शिकायला पाहिजे ....स्वतः उपाशी राहतील पण दुसर्याला पोट फुटे पर्यत खायला घालतील .... आपल्या कडे असलेली कोणतीही गोष्ट त्यांच्या घरच्या लोकांना नंतर कळेल पण सगळ्यात आधी शेजारच्या घरी माहित असते ....किंवा घरात एखादा नवीन बनवलेला पदार्थ शेजार्यांचा घरी आधी पोहोचलेला असेल.. मग शेजार्यांकडून समजते कि आपल्या घरात काय शिजलंय ते..
इंग्रजीतले ...YOu म्हणजे आपल्या मराठीत तू, तुम्ही , तुम्हाला पण आमचा कोकणात "तुका" म्हणे ....मग तो ५ वर्ष पासून ते ५० वर्ष पर्यंत कोणीही असो ...एकेरीतच ... जास्त tension घेव्क नको ... :D

खूप काही लिहिण्यासारखे आहे पण मी इथेच थांबते नाहीतर कोकणी माणसांनी हे सगळे वाचले ना तर ....माका तोंड दाखवूक जागा ठ्येव्ची न्हाय ....
.

No comments: